Wednesday 30 May 2012

वाचना साठी लतादिदिबद्दल

स्वरसाम्राज्ञी लतादीदी
सप्टेंबर महिना अापल्या देशाच्या दृष्टीने अभिमानाचा असतो. २८ सप्टेंबर! बरोबर ऐंशी वर्षांपूर्वी याच दिवशी या देशात जगातील एक सुरीले अाश्चर्य जन्माला अाले. अगदी एकमेवाद्वितीय भारतीय व महाराष्ट्रीयन असे हे जगातील अाश्चर्य म्हणजे लता मंगेशकर! नाव फक्त उच्चारायचाच अवकाश की गोड गाण्यांच्या तारकासमूहांची अाकाशगंगा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर …. माफ करा, मनात रुंजी घालायला लागते.
२८ सप्टेंबर, म्हणजे तुमच्या अामच्या सर्वांच्या हळव्या क्षणांच्या सोबती असलेल्या गाण्यांच्या जन्मदात्या, लतादिदींचा वाढदिवस! त्यांना त्या निमित्त लाख, लाख शुभेच्छा! दिदींच्या जीवनाबद्दल थोडी माहिती मी या लेखात देण्याचा प्रयत्न करीत आहे. यातल्या बऱ्याच गोष्टी सर्वश्रुत आहेत.
१) स्वरलतेची कुटुंबवेल: 
लतादिदींचा जन्म गुजराथी आई शुद्धमती व मराठी वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या कुटुंबवेलीवर सीख मोहल्ला, इंदोर येथे झाला. भारतदेशाच्या इतिहासातील तो सुवर्णक्षण होता.
गोव्याच्या मंगेशीचे हे कुटुंब हर्डीकर नावाने अोळखले जाई. त्यांची स्वत:ची नाटक कंपनी होती. त्या कंपनीचे नाव पुणे, कोल्हापूर, सांगली, मिरज येथील नाट्यरसिकांच्या मनात घर करुन होती. मास्टर दीनानाथांनी गोव्याच्या मंगेशीच्या अाशीर्वादास्तव अापले आडनाव मंगेशकर असे बदलून घेतले. फिरत्या जीवनशैलीमुळे मंगेशकर कुटुंबातील मुलांना शालेय शिक्षण मिळण्यात अडचणी येत. पण, गायनकलेचा वारसा व गाण्याचे शास्त्रपूर्ण शिक्षण घरच्या घरीच मिळाले.
२) बोलपटांचा उदय व कौंटुबिक आघात: 
१९३४ मधे पहिला बोलपट आलमआरा आला. बोलपटांमुळे दीनानाथ बलवंत मंडळ ही मास्टर दीनानाथांची कंपनी पूर्वीइतकी गर्दी खेचेना. हे कुटुंब त्यामुळे सांगलीला आले. नाटक कंपनी बंद पडल्यानंतर, १९४२ साली मास्टर दीनानाथांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
३) शाळा सुटली, पाटी फुटली:
आशाला सोबत नेले असता, शिक्षकांनी, "तिला न आणता शाळेत ये" असे सांगितले. त्यामुळे लतादिदी दुसऱ्या दिवसापासून शाळेत गेल्या नाहीत. फक्त एक दिवस शाळेत गेलेल्या लतादिदींना, सहा विश्वविद्यालयांनी डॉक्टरेट दिली आहे. त्यातील एक - न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी आहे. खरेतर त्या स्वत:च एक विश्वविद्यालय आहेत व त्यांची गाणी हा डॉक्टरेटचा विषय आहेत. पुढेही शालेय शिक्षण घेणे लतादिदींना जमले नाही, कारण मास्टर दीनानाथांच्या मृत्यूच्यावेळी त्या बारा वर्षांच्या होत्या. कुटुंबाची जवाबदारी नियतीने त्यांच्यावर टाकली होती. वडीलांच्या मृत्यूच्या आठव्या दिवशी "पहिली मंगळागौर" या चित्रपटासाठी, गाण्यासाठी व अभिनयासाठी लतादिदींनी पहिले पाऊल या क्षेत्रात टाकले.
४) अभिनय क्षेत्रातील पाऊलखुणा:
१९४२ "पहिली मंगळागौर"  अभिनेता - शाहू मोडक
१९६० "कालाबाजार" (हिंदी)
१९८७ "राजकपूर" (इंग्रजी)
२००० "पुकार" (हिंदी) 
या चित्रपटात लतादिदींचे नाव अभिनेत्री म्हणून आढळते.
५) भविष्यवाणी:
"माझी लता कमाल करेल!" हे वडिलांचे शब्द लतादिदींनी सार्थ केले. या शतकातील दहा सर्वश्रेष्ठ कुंडल्यामध्ये लतादिदींची कुंडली आहे. इतर गायक फक्त दोनच अष्टके गाऊ शकतात, लतादिदी मात्र आठ अष्टके गाऊन जातात. त्यामुळे त्यांचे स्वरयंत्र जगातील एकमेव मानले जाते. लंडनच्या अल्बर्ट हॉलमधील लतादिदी यांच्या गायनाचा आलेख संपूर्णतया बरोबर व आदर्श आढळला. गाणे गाण्यापूर्वी त्या कागदावर सुरुवातीला श्री लिहून खाली स्वत:च्या हस्ताक्षरात ते गीत लिहून काढतात व शेवटी आपली स्वाक्षरी करतात. त्यात देवाचा आशीर्वाद व दिदींचा सुगंध जाणवतो. ज्ञानेश्वर माऊलींचे एक तेजोवलय, त्यांनी "मोगरा फुलला" साध्या सोप्या शब्दात गाऊन, रसिकांना नादब्रम्हाच्या तालावर डोलायला लावले. 

६) संगीतकार लतादिदी:
आनंदघन नावाने त्यांनी संगीत दिले आहे. हा घन काही काळ बरसला. जेवढा काळ बरसला त्यात त्यांनी रसिकांना चिंब भिजविले. हा मोगरा फुलला व त्याचा सुगंध विश्वाला मोहित करुन गेला. राम राम पाव्हणे, मोहित्यांची मंजुळा, मराठा तितुका मेळवावा, साधी माणसं, तांबडी माती या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. या आनंदघनाने सूराच्या नादमय सुरावटीत रसिकांना चिंब भिजवून टाकले. 

७) मी मराठी:
लतादिदींवर महाराष्ट्रीयन मराठमोळे संस्कार आहेत. त्यांच्या घरी हिंदू सण, उत्सव, गणपती आनंदाने साजरे होतात. 'मी मराठी'चा रास्त अभिमान वाटायला, दादासाहेब फाळके ज्यांनी चित्रसृष्टीची सुरुवात केली, त्यांच्यानंतर मराठी माणसे या व्यवसायात कमीच आहेत. मात्र लतादिदीचे नाव त्यात पहिल्या क्रमांकावर आहे.
८) संगिताला वय, भाषा बंधन नसते:
अगदी नर्गिस, मधुबाला पासून आजच्या तरुण अभिनेत्री म्हणजे करीना इत्यादी पर्यंत त्यांनी प्लेबॅक दिला आहे. याबाबत त्यांना एका मुलाखतीत विचारले असता त्या म्हणाल्या होत्या की,  "माझ्याकडे याचे स्पष्टीकरण नाही. माझी गायनाची कारकीर्द इतकी प्रकाशित का झाली याचे उत्तर माझ्याजवळ नाही." लहान वयातील तरुणींनाही आज त्यांचा ८० व्या वर्षीचा आवाज शोभून दिसतो हा दैवी चमत्कारच म्हणायचा. आजपर्यंत त्यांनी पन्नास हजार गाणी म्हटली आहेत. बहुतांश भारतीय भाषांमध्ये त्यांची गाणी आहेत.
संगीताला वय नसते. देशाच्या मुकुटातील तो हिरा आहे. हिऱ्याच्या तेजाने डोळे दिपतात, कानसेन तृप्त होतात. हा हिरा चिरतरुण आहे, आवाज चिरंजीव आहे. प्रतिलता, बाललता वगैरे नावाने किती आले आणि गेले पण लता ती लताच!
९) दाता सुन, मौला सुन:
'जेल' या मधुर भंडारकरांच्या चित्रपटातील हे भजन २१/०७/०९ ला गायले. गुढघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी हे रेकॉर्डींग पूर्ण केले व "हनुमान चालीसा" ही त्यांची रेकॉर्डही पूर्ण केली. "ऐ मालीक तेरे बंदे हम.." या प्रार्थनेपासून सुरु झालेला हा सुरीला प्रवास असाच चालु राहो!
१०) आहार, आजार:
अगदी झणझणीत तिखट त्यांना आवडते. लवंगी मिरची खाणाऱ्या दिदी मधाप्रमाणे गोड हसतात. तळलेले मासे, कोल्हापूरी तांबडा रस्सा मटन त्यांना आवडते. 
बालपणी तिसऱ्या वर्षी त्यांना देवी आल्या होत्या. त्यांना सायनसचा त्रास आहे. नुकतीच त्यांची गुढघ्याची शस्त्रक्रिया झाल्याचे वर आलेच आहे.
११) सैनिकहो तुमच्यासाठी:
१९६२ च्या भारत चीन युद्धानंतर लतादिदींनी गायलेले "ऐ मेरे वतन के लोगो .." उत्कृष्ट देशभक्तीपर गीत आहे. या गाण्यातील आर्तता मनाला भिडल्याने पंडीतजीच्या डोळ्यात अश्रु तरळले होते.
१२) आयेगा आनेवाला:
गूढ, आशादायी, करुण किनार असलेले, गतजन्मीचे नाते सांगणारे हे गाणे त्यांचे स्वत:चेही आवडते गाणे आहे, तसेच लोकप्रियही!
हातातील छोट्या हातरुमालाशी चाळा करीत, गोड आवाजात बोलणारी, पांढऱ्या साडीतील लतादिदींची मूर्ति गानसरस्वतीच वाटते. त्यांच्या पांढऱ्या साडीला, त्या, त्या दिवसाच्या ग्रह, रंगाप्रमाणे किनार असते. त्यांच्या पायात सोन्याची साखळी असते व त्यांना हिऱ्याचे दागिने आवडतात.
१३) स्वभाव:
त्यांचा स्वभाव मनमिळावू आहे. त्या लाजऱ्या, बुजऱ्या अंतर्मुख व्यक्ति वाटल्या तरीही मैत्रीनंतर कळते की त्या मिस्किल, विनोदी स्वभावाच्या अाहेत व अनेक विनोदी किस्से व चुटकुले सांगतात. त्यांना फोटोग्राफी व स्वयंपाकाचा छंद आहे. "देवाने दिले त्यात मी तृप्त आहे" अशा शब्दात त्या आपल्या जीवनगाथेचे वर्णन करतात. भारतरत्न सारखा उच्च किताब मिळूनही त्या विनम्र आहेत. आपल्यापेक्षाही अधिक उत्कृष्ट कलाकार जगात आहेत असे म्हणून त्या नवोदित कलाकारांचे कौतुक करतात. आपण आई, वडीलांच्या आशीर्वादामुळेच भारतरत्न मिळवू शकलो असे त्या सांगतात. १९४२ सालापासून २०१० पर्यंत ६८ वर्ष गात असूनही त्या वडीलांच्या अपमृत्यूची खंत काढतात. विनम्रपणामूळे कलाकाराची उंची हिमालयाएवढी वाढते हे लतादिदीवरुन कळते.
१४) समाजसेवा, ऋण फिटता फिटेना:
१९४९ साली दादरा, नगर हवेलीच्या मुक्तीसाठी लतादिदींनी पुण्यात चॅरिटी शो केला होता. १९८५ साली टोरंटोत त्यांच्या चॅरीटी शो वैशिष्ट्य म्हणजे, तिसऱ्या जगातील कलाकाराने पहिल्या जगातील कलाकारासाठी सेवाभावी कार्यक्रम करण्याची ती पहिलीच वेळ होती. २००१ मध्ये गुजरात भुकंपग्रस्तासाठी त्यांनी कार्यक्रम केला होता. त्याच वर्षी पुण्यात सर्वसोयींनी सुसज्ज असे मंगेशकर हॉस्पिटल त्यांनी सुरु केले. वृद्धाश्रम काढायचा त्यांचा मानस आहे.
१५) घर:
लतादिदी प्रभूकुंज या पेडर रोड वरील इमारतीत आपली भावंड - बहिण मीना, आशा,  उषा व भाऊ हृदयनाथ सह राहातात. प्रभूकुंजवर वर्दळ नसते पण दिदींची भेट झाली नाही. काही स्वप्ने आयुष्यात पूर्ण होणे अवघडच असते.
१६) फिरुनी नवी जन्मेन मी:
लतादिदींना पुढील जन्मी पुन्हा भारतीय व महाराष्ट्रीयन म्हणून जन्माला यायचे आहे, मात्र पुन्हा स्त्रीजन्म नको असावा. मलापण तसेच वाटते
१७) एकमेव अद्वितिय:
भारतरत्न व दादासाहेब फाळके पुरस्कार दोन्ही मिळालेल्या त्या एकमेव महिला आहेत. लंडनच्या अल्बर्ट हॉलमध्ये कार्यक्रम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. गिनीज बूक मध्ये जास्तीजास्त गाणी गाण्यासाठी त्यांचे नाव नोंदले आहे.
१८) ऐ मालीक तेरे बंदे हम:
परमेश्वरा तू आम्हाला लातादिदींसारखी गायिका दिलीस, त्यांच्या अनमोल सुरांचे दान दिलेस. किती धन?
'पायोजी मैने राम रतन धन पायो'
'कैसे दिन बीते कैसी बिती रतियॉ'
'दिलका दिया जलाके गया'
'दुनिया करे सवाल'
'अल्ला तेरो नाम'
'तेरे लिये हम हे जिये'
….. ही दिदींची आवडती गाणी
१९) मी कशी शब्दात सांगू:
गानकोकीळा, स्वरसाम्राज्ञी कुठल्याही शब्दांने वर्णन करा, शब्द तोकडेच पडतात. दिदींवर आजपर्यंत अनेक पुस्तके लिहिली गेली. हरीश भिमाणींचे "इन सर्च अॉफ लता मंगेशकर", राजू भारतनचे "लता मंगेशकर बायोग्राफी" ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. नदी म्हणजे पाणी नव्हे तर खुप काही अर्थ त्या शब्दात सामावला असतो तसे सूर व ताला पलिकडे दैवी काही लतादिदींच्या गाण्यात आहे.
२०) काळ बदलला? कधी?:
रिमिक्सचा जमाना आला. एक्सप्रेस वे वरून व विमानामधून जलदगतीचा प्रवास सुरु झाले, मात्र बाळ जन्माला आले की अजूनही बघा को ऽ हम ऽ ऽ असेच रडते. सूर्य पूर्वेलाच उगवतो. दिवसाची सुरुवात पुजेनेच होते व आवडती गायिका लता मंगेशकरच असते. 


२१)भैरवीची गोष्ट कशाला? आकाश नीळे असे पर्यंत लतादिदी गात राहतिल.
"दिदी, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे!"
दिदींना वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा!
शुभांगी पासेबंद
(scpaseband@gmail.com)           

1 comment: