Monday, 21 May 2012

आईचे आशीर्वाद

"घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिला पाशी"
अशी म्हण मराठीत आहे, तशीच एक संकल्पना मला परदेशी साहित्यात वाचण्यात आली. 'हेलिकॉप्टर मदर्स' म्हणजे "घिरट्या घालणाऱ्या आया." या आया, मुले शाळेत गेली, दूर गेली किंवा त्या स्वत: कामावर गेल्या तरीही मुलांच्या आसपास घिरट्या घालत असतात. म्हणजे फोन, इंटरनेट या माध्यमांद्वारे संपर्क साधून असतात.

मुले झिडकारतात, दूर्लक्ष करतात, हिडीसफिडीस करतात. "आई कटकट आहे म्हणतात", पण आई दूर्लक्ष करते. मुलाच्या आसपास वावरणारे कुणाच्याही नजरेच्या आवाक्याबाहेरचे दुष्ट शक्तिंचे विळखे तिच्या तिसऱ्या डोळ्याला बरोबर जाणवतात. तिच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी अधू झाली तरी तिच्या  तिसऱ्या डोळ्याला सर्व लख्ख दिसत असते. कुठली संगत मुलाला चांगली नाही, कुठला रस्ता मुलीला यायला चांगला नाही हे त्या आईच्या तिसऱ्या डोळ्याला त्या व्यक्तिच्या संपर्कात न येताही व त्या रस्त्यावरुन 'न' चालताही बरोबर कळते. तिची टेलीपथी अशी असते.
कंटाळा नाही, वीट नाही
आळस नाही, त्रास नाही
मातेवेगळी, मातेसम कुणी नाही
इतुकी माया कोठेची नाही
(दासबोध)
मुलांना आई दमली असली तरी सोबत यायला आईच हवी. तो बाबा घरात दमल्याची कहाणी ऐकवत पेपर वाचत टीव्ही बघत बसतो. पण दमल्यावर कोलमडून पडे पर्यंत आई कष्ट करत राहाते. पण मुलगा चुकला की "आईचे लाड" हा आरोप येतो. 

आई बद्दल खूप लिहीले गेले आहे. 

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही
म्हणून श्रीकारानंतर शिकणे अ, आ, ई …
असेही लिहिण्यात आले आहे.

मातृत्वाची तयारी, गर्भसंस्कार अशाप्रकारे अनेक आर्थिक मोबदला देवून शिकवले जाणारे वर्ग सुरु झाले आहेत. मात्र या विषयावर स्वानुभव हाच गुरू असतो. घर भर पसारा, आईला बाळंतपणामूले आलेला अशक्तपणा, आधार नसल्याची भावना, ही मातृत्वाची जबाबदारी यामुळे तिला गोंधळून जायला होते. मुल मोठे झाल्यावर, हे करू, ते करू असा विचार ती स्वत:शीच करत असते. तिला कुणाची मदत मिळाली तरीही आई जे कष्ट करते त्याची जागा तर कुणीच घेऊ शकत नाही.

वळवाच्या पावसाला व आईच्या कष्टाला मोजमाप नसते. कशाही परिस्थितीत असो, कष्टाला आईच हवी! मुलांची नर्स, मैत्रिण, सवंगडी, न्यायाधीश, वकिल, मध्यस्त, स्वयंपाकीण, मोलकरीण सर्व आईच असते. मुलांचे मन मोडू नये म्हणून गळ्यातील चेन मोडून ती त्याला सहलीला पाठवते. जगात लढायला तयार करण्यासाठी - त्याला कराटे क्लासला घाल, पोहायला शिकव. स्वत: काळजी करत बसते. आईही फक्त आईच असते. घरातील इतर गोष्टीतून तिचे लक्ष फक्त मुलातच असते. नवरा अोरडतो, "तुझे हल्ली माझ्याकडे लक्षच नाही", पण ती आईच्या भूमिकेतून बाहेर येऊच शकत नाही. आईपणाचा तो गणवेष घालून ती अहोरात्र आईच्याच भूमिकेत वावरते. ती मुलाच्या द्वारा जगते. मुलांच्या जीवनात तिचे अभेद्य व अटळ स्थान काही काळच असते पण आईच्या जीवनातील मुलाचे स्थान अाजन्म असते. आईचे लाड हे जन्मभर साथ देतात. कोवळ्या वयापर्यंत मुलाला आई बद्दल खुप प्रेम असते. आईचे हातात पकडलेले बोट त्याला सर्वाधिक जवळचा सुखशांतीचा शॉर्टकट वाटतो.
तेंव्हा शिकलेले कसे छान समजत असे
सगळे रंग तेंव्हा कसे छान वेगळे निघत
इतिहासातील सगळ्या राजांना मिशा असत 
तेंव्हाना धनुष्यबाण घेऊन मी लढाईला जात असे (जिंकत असे)
तेंव्हा ना मुठीमध्ये आईचे बोट बंद असे

आईचा मुलावरचा मालकी हक्क तिला जगापासून वेगळे पाडतो, पण तिला पर्वा नसते. मुल व आई यांचे स्वतंत्र राज्य या कालात असते. वडील या काळात पेईंग गेस्ट असतात किंवा बाबांची कहाणी ऐकवत बसतात.

आताशा या वाढत्या वयाबरोबर
मी खुपशी आईसारखी दिसायला लागलेय
जीव हरवून बसलेली असहाय नजर
अोढग्रस्तीला लागलेले अवघे शरीर - सारे तिच्या सारखेच!
आणि सवयही लागलीय तीच तशीच
'अो' न येणाऱ्या हाका मारत बसायची
आई तुझ्या अनावर आर्त हाकेला
उत्तर द्यायचे आम्ही टाळत होतो
तेंव्हा असच थारोळ साठायच का ग?
खरं सांगू का ते सारं आता आठवून
पाझरणारे हे डोळे पुसायला
हवाय आई तुझाच पदर! देशील आई, देशील?
तुला जगवण्यासाठी मी काहीही करु शकत नाही
हे लक्षात आल्यावर मनात विचार आला
तुझी तू जगत होतीस तेंव्हा तरी
तू जगावस, अस तुझ्यासाठी माझ काही चालल होते का?
मी तुझ्यासाठी काय केले?

आईसाठी करण्यासारखे खुप काही असते पण तिला गृहित धरुन आपण काहीच करत नाही, आणि तिच्या श्राद्धाला मात्र डोळे टिपून ताटभर जेवण वाढून कावळा शिवायची वाट बघत बसतो! तरीही आई मुलाला आशीर्वाद देते. आईचे प्रेम असे असते. आईचे लाड असे असतात.

शुभांगी पासेबंद
(scpaseband@gmail.com)
09869004712    

No comments:

Post a Comment